मनोगत

किर्रर्र काळोखी रात, ओलेती..
वेदनेच्या दुःखाने भिजलेली.

चिघळलेल्या जखमेतला तो ओलावा, सुखावणारा कधीच नव्हता.
वरवर केलेली मलमपट्टी फक्त त्रास लपवणारीच!!

सल कुठं तरी खोल आत दडली होती.

आता मुळापाशी संजीवनी पोहोचल्याशिवाय सुटका नाही!!- मन बोलले

-सुमंत सांबरे

Advertisements
Posted in मुक्तछंद | Leave a comment

In a while!!

Mountains will lie down in a while,
rivers will dry out in a while,
this wind will fade out in a while,
what will remain is the enchanting thirst for divinity.
Once quenched my thirst with the drop of blissfulness,
even I won’t remain me, in a while!!

Sumant
21Mar18

Posted in मुक्तछंद | Leave a comment

रंग सारे दूर झाले!

आजूबाजूला सांडलेल्या पसाऱ्यात प्रत्येक वस्तूचा एक रंग होता,

कुणाचा गडद, कुणाचा हलका, कुणाचा मलमली तर कुणाचा फिका.

एकाच रंगाच्या अनेक छटा देखील पहायला मिळाल्या

प्रेमाचेच घ्या ना….

मातृत्वाचा होता शुद्ध पांढरा आणि सौभाग्याचा गर्द लाल मांगल्याचा,

नवजाताचा होता गोंडस गुलाबी अन प्रेयसीचा मोहक अबोली,

राधेकडे तर चौफेर रंगपंचमीच होती,

मीरा मात्र लीन होती भक्तिमय भगव्यात

इतक्या उत्कट, मोहक रंगांमुळे, आधी प्रेमच नजरेस पडलं.

चुकून त्याच्या वरून नजर इतर वस्तूंकडे गेली आणि डोळ्यांना काहीतरी गडद स्पर्शून गेलं,

दुःखाचे काळसर जांभळे अस्तर बेवारस पडले होते.

काळवंडलेल्या लाल डोळ्यांनी द्वेष, मत्सर आणि चीड त्याला घाबरवत होते.

दुःखाच्या मदतीला फिकी पडलेली जीर्ण बदामी सहानुभूती आली,

पण तिचा काही टिकाव लागला नाही.

कृष्णाची एक निळसर सावळी मूर्ती दुरूनच हे सारे बघत होती.

मूर्तीच ती, ती काय मदत करणार म्हणा….

तपकिरी-राखाडी मातीला पायाखाली तुडवून,

आग ओकणाऱ्या पिवळ्या भट्टीत तापवून,

नंतर खोटा रंग तिच्यावर चढवला होता!!

अचानकच सोसाट्याचा वारा सुटला अन सगळ्याच रंगानी धूम ठोकली

कारण अनंत रंगांनी भरलेला हा पसारा उधळून टाकण्याचे सामर्थ्य, त्या रंग नसलेल्या अव्यक्तामध्येच होते.

Posted in मुक्तछंद | Leave a comment

डोह

आज अचानक कर्णकर्कश कलकल ऐकू आली

घोंघावणारी, हेलावणारी, कानात शिसे ओतणारी

त्या साऱ्याचा माग काढत मी अखेर मनाचा तळ गाठला

क्षण भर तेथे थांबलो अन् पाय दलदलीत रुतला

काही कळावे इतक्यात समोर तगमग उभी ठाकली होती,

तिच्या पाठोपाठ, थोड्या अंतरावर, तडफड उभी होतीच.

दोघींचे ते भीषण अस्तित्व सभोवताली सारे, एक मोठे वावटळ विणू लागले…

मग पाय खोल रुतलेले आणि शीर शरीरापासून ओढलेले, अशी दिनवाणी अवस्था…

जणू छिन्न छिन्न विलगत होते माझे गात्र गात्र….

एखादा बदल किती नकळत होतो किंवा तो होताना आपण अनभिज्ञ असतो!!!

हाच डोह एकेकाळी रम्य सरोवर होता.

दररोज आदित्याच्या किरणांनी उजळून निघायचा.

आज मात्र गूढ, काळाकुट्ट, हसत होता दात विस्फारून….

त्याच्या गर्भातून उठणारे बेसूर स्वर, रडगाणं गात होते,

“अखेर तुजला गाठले मी,

तावडीत माझ्या आणिले मी

आता जाशील कोठे दीन, दुबळ्या

दाही दिशांना व्यापिले मी”

हतबलता, लाचारी, आणि शरणागती स्वीकारणारे पराभवाचे मनोगत मांडायला मी शेवटचा हुंकार दिला.

ओठातून ‘मी’ उच्चारल्या क्षणी, सगळीकडे एक थरथर पसरली…..

पुन्हा एकदा त्या अवस्थेत स्वत्वाचे स्पंदन स्फुटले अन् डोह खळाळला,

त्यातले भेसूर सारे वाफ होऊन कुठे तरी दूर विरून गेले होते,

वावटळ आता राहिलेच नव्हते अन् तेथून निघायला नवे पाय फुटले होते.

मनाचा तळ आता डोहातून सहज, स्पष्ट दिसत होता.

नुकत्याच न्हालेल्या उषेच्या शुभ्र वस्त्रावर जणू त्या दिवाकराने सोनसळी केशर पसरले होते.

-सुमंत सांबरे

Posted in मुक्तछंद | Leave a comment

तो आणि मी

आज तो साजरा करतोय त्याचा दिवस, वय वाढल्याचा

खरंच वाढलंय का काही त्याच्यात, का कमी झालंय?

कमी काय झालंय आणि वाढलंय तरी नक्की काय??

खोटी प्रतिष्ठा, वाढलेलं पोट का खिश्यात असलेल्या cards चे बँकांमध्ये उघडलेले account जड झालेत?

कमी झालंय का त्याचं कुरबुरणं, स्वतःच्या आनंदासाठी मांडलेला पसारा वाढवणं, त्यात रमणं?

काही कमी नाही नि जास्त नाही!!

युगांयुग तो तसाच प्रवास करतोय, त्याची मर्यादा ठरलेली

गाठलेली उंची ठरलेली आणि झालेली फरफटही ठरलेलीच

आज त्याला शुभेच्छा द्याव्या म्हणतोय आणि कानात एक गुपित सांगावसं वाटतंय

“तू जी शाल पांघरून मिरवतोय ना गुलाबी थंडीत, त्यात आतून ऊब देणारा ‘मी’ तुझ्यातच राहतो. कधी वाटलं भेटावसं तर हाक मार, येईन मी.”

आता या अनपेक्षित शुभेच्छेमुळे ‘तो’ पुरता बावरलाय

अन् मी मात्र हसतोय, कधीचाच!!!

Posted in Uncategorized | Leave a comment

असं होतं ना!!!

असं होतं ना!!

कधीतरी उर फुटून सांगावसं वाटतं मनातलं,

कुशीत शिरून ढगांसारखं कोसळावसं वाटतं

आणि नेमकं जवळ कुणीच नसतं,

असं होतं ना!!

थकलेल्या खांद्यावरचे ओझे थोडे हलके करण्यासाठी

बचबच गर्दी मध्ये मदतीचा एखादा हात दिसतो

मात्र तो ही भास असतो,

असं होतं ना!!

रणरणत्या निर्जीव आयुष्याच्या प्रवासात

तहानलेल्या एकाकी पांथस्थाला दिसावे एखादे निळसर डोह

आणि जवळ जाता कळावे ते डोह नव्हते, होते फक्त मृगजळ

असं होतं ना!!

तुफानाच्या तडाख्याने भग्न घरात बसून ओल्या डोळ्याने आयुष्याची फरफट बघावी

आणि पुढल्या क्षणी छप्पर कोसळून त्याच आयुष्याची करुण संध्याकाळ व्हावी….

असं होतं ना!!

-सुमंत सांबरे

Posted in मुक्तछंद | 1 Comment

श्रीकृष्णार्पणमस्तु

रुक्मिणीच्या लटक्या रागाचे श्रीकृष्णास पडले कोडे
बोलाया तो धावला, ती घेई आढे वेढे

सांग सखे का धरिला असा, अबोला जीवघेणा
तुझ्या पायी श्रीमंती सारी दारी सोनियाचा मेणा

रत्ने बहु, भरजरी शेले आणुनि तुजला दिले
रूपवती सांग मला तू, हृदयी काय दुःख तुज सले?

म्हणे रुक्मिणी, असती सारे बहु मज, रुची नाही तयाची
सलते मनी हे वैभव आता, नको मौज महालाची

श्रीहरी संगे क्षण क्षण जगावा, सतत ध्यास हा चाले
विरहाच्या ह्या कल्पनेने, घाव करिती शंकेचे भाले

विसरलात का मला श्याम सख्या, गुन्हा काय असा झाला
जणू कुणाची दृष्ट लागली आपुल्या सहजीवनाला

नको मज हा संग सख्या, दररोज काळीज हे जाळी
पती सुखाच्या नसती रेषा मज दुर्दैवी भाळी

स्मितहास्य करीत सावध पावलाने, जवळी आला मुरारी
म्हणे वेडे उगा करीशी चिंता, बघ तुझ्या अंतरी

मिटुनी घे डोळे, आठव मग त्या मंगलसमयीच्या घटिका
गगनातुनी पुष्प उधळले, नाचू लागल्या लतिका

लग्नसंस्कार झाले मंगल, अमूर्त झाला सोहळा
परस्परांच्या स्पंदनांनी, जन्मला मनी जिव्हाळा

नाही मजला दूर कधी तू, नाही दिले अंतर
हा अवघड क्षण असेल सखे, नात्यातील मध्यंतर

दैवत्वाचे ओझे वाहणे, हे तर ह्या जन्मीचे काम
तरी जन्मोजन्मी तुझेच सखी ह्या हरीच्या हृदयी नाम

मानवरुपी ह्या देहाचे भोग आपण सारे भोगतो
निर्मिलेल्या भावविश्वाच्या गुंत्यात का असे अडकतो?

सृजनशील तू, शक्तीरुप तू, ऊर्जा ह्या विश्वाची
का धरिते राग सखे तू, लक्ष्मी नारायणाची

चल मांडुया डाव परत हा, खेळूया संसारखेळ
जिंकुनी घेऊ त्रिभुवन सारे, होता आपुला मेळ

त्या क्षणी रुक्मिणीस दिसले अद्वैत अलोट प्रेम
नांदू लागले सौख्य महाली, हासले नात्यातले हेम

-सुमंत सांबरे

Posted in Uncategorized | Leave a comment